श्री
तुझे तेच माझे असू लागले...
-------------------
श्रीराम ग. पचिंद्रे
--------------
कविवर्य सुरेश भट यांच्या एका गझलेतील दोन शेर आहेतः
लपंडाव माझा तुझा संपला
तुझे तेच माझे असू लागले...
तुझ्या अंतरी कोणती वादळे
मला हेलकावे बसू लागले...
पती आणि पत्नीच्या सहजीवनाचे मर्म सहजपणानं सांगणारे हे दोन अर्थपूर्ण शेर आहेत. ‘ती’ जेव्हा त्याची होते आणि ‘तो’ जेव्हा तिचा होतो, तेव्हा एकमेकांमध्ये जे काही नाते निर्माण झालेले आहे, ते शब्दांशिवायही प्रकट व्हायला लागते. दोघांना एकमेकांपासून काही लपवण्याची आवश्यकताच उरत नाही, कारण दोघांचे दोघांना आणि दोघांना दोघांचे असं होऊन जातं. लपंडाव केव्हा संपला हे दोघांनाही कळत नाही, ़इतक्या सहजपणे तो संपून जातो. हेच तर सहजीवनाचं मर्म आहे. एकमेकांवरील प्रगाढ प्रेम आणि विश्वास यावरच सहजीवनाचा आनंद अवलंबून असतो. घटस्फोट हा शब्द आपल्या माहीतही नाही, असाही एक काळ भारतात होता. एकदा मुलीचं लग्न लागलं आणि ती सासरी नांदायला गेली, की ती माहेरची पाहुणीच व्हायची, फक्त पाहुणी. बाकीचं तिचं जे काही व्हायचं, ते तिच्या नवर्याघरीच. ती जगली काय नि मेली काय, ते सासरीच. सासरघरातून तिचा मृतदेहच बाहेर आला पाहिजे, ती नव्हे, असा सामाजिक नियमच होता.
काही दिवसांपूर्वी ‘आनंदी गोपाळ’ हा एक नितांत सुंदर चित्रपट पाहिला. भारतातील पहिली महिला डॉक्टर असा इतिहास निर्माण केलेली डॉ. आनंदी
गोपाळ जोशी हिच्या जीवनाचा पट उलगडून दाखवणारा हा चित्रपट आहे. ह्यात आनंदी आणि गोपाळराव यांचं सहजीवन पहायला मिळतं. एकोणिसावं शतक संपत आलेलं असतानाचा हा काळ आहे. 1865 ते 1867 एवढंच बावीस वर्षांचं आयुष्य लाभलेली आनंदी. तिचा नवरा गोपाळ हा तिच्यापेक्षा दुपटीहून मोठा. ती जेमतेम बाराची, तर तो पंचवीशीचा. ती बालिका आणि कुमारिका आणि तो तरुण बिजवर.
तो काळच बालविवाहाचा होता. जवळजवळ तिच्या वयाचा तिचा सावत्र मुलगा होता. असा हा बराचसा विजोड दिसणारा संसार सुरू झाला. गोपाळ हा सुधारकी विचारांचा होता. आनंदी सुरुवातीला पारंपरिक विचारांची होती. गोपाळच्या आग्रहाने, काहीशा आततायी हट्टाने ती ख्रिश्चन शाळेत जाऊन शिकायला लागली. एका बाजूला, सनातनी ब्राह्मण वर्गाने धर्मबुडवी म्हणून तिचा छळ केला, तर दुसरीकडे मिशनरी शाळेतील ब्रिटिश मुलींनीही तिचा ‘काळी’ म्हणून छळ केला. दोन्ही बाजूंनी छळ सोसणार्या आनंदीला शिकण्यासाठी काहीशा कठोर मार्गांचा अवलंब करून गोपाळरावानं खंबीर पाठिंबा दिला. गोपाळरावालाही सनातन्यांच्या छळाची झळ पोहोचते, पण त्यातून तावून सुलाखून तो अधिकच दृढनिश्चयी होतो.
हे सारं सुरू असताना त्यांच्यातील एक विचित्र असं प्रेमही पहायला मिळतं. नवर्याच्या खंबीर पाठिंब्यामुळं आनंदी डॉक्टर होण्याचा निश्चय पूर्ण करते, तडीस नेते. पतीचं पत्नीवरचं नितांत प्रेम एकाच क्षणी दिसतं; कोलकत्याच्या किनार्यावरून आनंदी एका पडावातून मोठ्या बोटीवर जाण्यासाठी निघते, तेव्हा! तो तिला निरोप देताना काळजी घेण्यासाठी ओरडून ओरडून सांगतो, तेव्हा, त्याच्या स्वरातील कातरता जाणवते. आणि नंतर हे प्रेम जाणवते एकमेकाला पाठवलेल्या पत्रांमधून! पण त्याआधी ते एकमेकांची ज्या पद्धतीनं काळजी घेतात, त्यातूनही त्यांच्यातील प्रेम दिसत राहतं. ऋतुदर्शन झालेल्यानंतर गर्भाधान विधी होतो, पण ती भयभीत झालेली असल्यामुळं तो तिच्यावर बळजबरी न करता सामंजस्यानं वागतो. हे अनोखं सहजीवन चित्रपटात सुंदर चित्रित केलेलं आहे. आपल्या संस्कृतीचा एक कालखंड त्यात दिसतो. एका आगळ्या सहजीवनाचं हृद्य दर्शन घडतं.
सहजीवन हे एकेकांवरील प्रगाढ विश्वास आणि प्रेम यांतून आकाराला येते. प्रेमविवाह डोळस असावा की अंध असावा? मोठाच प्रश्न आहे. खरं तर प्रेम अंध असलं, तरी विवाह डोळस असावा. बरेच प्रेमविवाह फसतात; का फसतात? लग्नापूर्वी, ते प्रेमात असतात तेव्हा आपापल्या चांगल्या बाजूच जोडीदारासमोर ठेवलेल्या असतात. पृथ्वीवासीयांना चंद्राची फक्त प्रकाशमान बाजूच दिसते आणि ती सुंदर दिसते, तशी प्रेमिकांना आपापली सुंदर बाजूच दाखवायची असते. आणि उरलेली कुरूप किंवा विरूप बाजू ही लग्नानंतर उघडी पडते. मग कोणतंही कारण पुरतं. भांडण, मतभेद, मनभेद आणि घटस्फोट असं क्रमाक्रमानं घडत जातं. नवरा दारू पिऊन मारहाण करतो, हे मोठंच कारण झालं, पण नवर्याला दररोज सकाळी खायला करून द्यायला लागतं, हेहि कारण विभक्त व्हायला
पत्नीला पुरतं. क्षुल्लक कारणावरून घटस्फोट मागण्याची अशी अनेक उदाहरणं समाजात आहेत.
प्रश्न असा आहे की, तरुण- तरुणींना असं अल्प काळ एकत्र नांदून काय मिळवायचं असतं? याच प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. कारण विभक्त झाल्यानंतर दुसरं लग्न होणंही सोपं नसतं. नोकरी करून आपल्या पायावर उभं राहणं आणि संसाराची कटकट सोडून देऊन आपल्या मनाप्रमाणं मुक्त जगणं याचंही आकर्षण तरुणींना असावं.
मुलीच्या संसारात तिच्या आईचा हस्तक्षेप हे संसार मोडण्याचं एक महत्त्वाचं कारण असल्याचं अलीकडच्या काळात दिसून आलेलं आहे. मुलगी नवर्याच्या घरात एकदा दिली की, ती माहेरच्या दृष्टीनं मेली, ही एके काळची टोकाची भूमिका हळुहळू मागे पडली. रुसून माहेरी जाण्याचं प्रमाण वाढलं. पण प्रकरण फारसं ताणून न धरता तडजोड करून पत्नी सासरी येत असे. संसारात भांड्याला भांडे लागायचेच, हे सार्यांनीच गृहित धरलेलं असतं, त्यामुळं तडजोड करून संसार टिकवला जात असे.
संसारात तडजोड महत्त्वाची आणि अपरिहार्य असते. ती दोघांनीही करायची असते. लग्न हे केवळ त्याचं आणि तिचंच नसतं. ते त्या दोन कुटुंबांचं असतं. दोघेजण विभक्त होणं याचा अर्थ दोन कुटुंबं आणि त्यांचा सारा आप्तेष्ट वर्ग विभक्त होणं असतं. त्यामुळं त्या दोघांमधल्या समस्या ह्या सर्वांच्या समस्या होऊन जात. तडजोड घडवून आणणारे कुटुंबीय सभोवताली असायचे. त्यांना त्या जोडप्याचं अभिक्तपण अपेक्षित असायचं. त्यांनी एकत्र संसार करावा अशी प्रमाणिक, तळमळीची इच्छा असणारी ही हितचिंतक मंडळी असायची. पण अलीकडच्या काळात लहानसहान कारणांवरून मुलगी माहेरी नेहमीसाठीच परतायला लागली. कारण तिला योग्य मार्गदर्शन करणारी हितचिंतक मंडळींचा अभाव तरी असतो किंवा त्यांचं ऐकण्याची तिची मानसिकता नसते.
नवर्याशी अगदी इवलंसं जरी खटकलं, तरी तिच्या मनात ठिणगी पडायला लागली आणि तिची आई त्या ठिणगीवर फुंकर मारून तिचा वणवा करायला लागली. यात मुलीच्या बापापेक्षा आईचा सहभाग जास्त असतो असं दिसून आलेलं आहे. ज्यातून कुणाचंच हित साधत नाही, असा निर्णय घेतला जातो.
एक कुटुंब मोडतं आणि त्याला जोडलेल्या सार्या नातेसंबंधातही अंतर निर्माण होते.
गेल्या काही वर्षांपासून, म्हणजे सुमारे 20 वर्षांपासून भारतात लग्नाशिवाय नातेसंबंधात (लिव्ह इन रिलेशनशिप) राहण्याची संकल्पना रुजली. काही जोडपी एकमेकाला पसंत करून एकमेकाला सोबत करत रहायला लागली. त्या संबंधातून काहींनी अपत्यजन्माचा स्वीकार केला, तर काहींनी अपत्यप्राप्ती टाळणंच पसंत केलं. यापैकी काही जोडपी कालांतरानं विभक्त झाली. तर काहींनी आपलं आता एकमेकाशी चांगलं जमतंय, तेव्हा जन्मभर एकत्र रहायला चालेल असा विचार करून लग्न केलं. काही जोडप्यांनी आधी मूल जन्माला घातलं आणि नंतर लग्न केलं अशीही काही उदाहरणं आहेत.
भारतीय समाजात विवाह हा संस्कार असतो. नातेसंबंधांत केवळ एकत्र राहिल्याने हे संस्कार होत नाहीत. विवाहातील संस्कार हे धार्मिक असतात, तसेच त्यात पती- पत्नीनं एकमेकांना ‘धर्मे च अर्थे च कामे च..’ अशी सात वचनं दिलेली असतात. ह्या वचनांचं पालन करत आयुष्य एकत्र व्यतीत करायचं असतं. सर्व सुखदुःखात एकमेकाला साथ देण्याची ही वचने असतात. विवाहात यज्ञकुंडाभोवती सप्तपदी घालणे म्हणजे सात वचने असतात. सप्तपदीची ही वचने अशी आहेतः
पहिले पाऊल :
तीर्थव्रतोद्यापनयज्ञ दानं
मया सह त्वं यदि कान्तकुर्या:।
वामांगमायामि तदा त्वदीयं
जगाद वाक्यं प्रथमं कुमारी ॥1॥
तू एक पाऊल चाललीस, तुझे-माझे सख्य झाले. तू स्वादिष्ट अन्न तयार करणारी अन्नपूर्णा हो. माझ्याशी एकनिष्ठ रहा. आपल्या कुटुंबाचे आपण कल्याण करू.
दुसरे पाऊल :
हव्यप्रदानैरमरान् पितृश्चं
कव्यं प्रदानैर्यदि पूजयेथा:।
वामांगमायामि तदा त्वदीयं
जगाद कन्या वचनं द्वितीयम् ॥2॥ तू माझ्याबरोबर दोन पावले चाललीस, माझे बळ वाढवणारी हो. आपण धैर्य आणि सामर्थ्य ठेवून कुटुंबातील आनंदाचे रक्षण करू.
तिसरे पाऊल :
कुटुम्बरक्षाभरंणं यदि त्वं
कुर्या: पशूनां परिपालनं च।
वामांगमायामि तदा त्वदीयं
जगाद कन्या वचनं तृतीयम् ॥3॥
तू माझ्याबरोबर तीन पावले चाललीस, तू धनप्राप्त करून देणारी हो. आपण दोघे संपत्ती व ज्ञानाची संमृद्धी करू.
चौथे पाऊल :
आयं व्ययं धान्यधनादिकानां
पृष्टवा निवेशं प्रगृहं निदध्या:।
वामांगमायामि तदा त्वदीयं
जगाद कन्या वचनं चतुर्थकम् ॥4॥
तू माझ्याबरोबर चार पावले चाललीस, तू सुख वाढवणारी हो. आपण दोघेही सुख, आनंद वाढवू.
पाचवे पाऊल :
देवालयारामतडागकूपं
वापी विदध्या: यदि पूजयेथा:।
वामांगमायामि तदा त्वदीयं
जगाद कन्या वचनं पंचमम् ॥5।
तू माझ्याबरोबर पाच पावले चाललीस, तू संतती वाढवणारी हो. आपण दोघे सद्गुणी संतती निर्माण करू.
सहावे पाऊल :
देशान्तरे वा स्वपुरान्तरे वा
यदा विदध्या: क्रयविक्रये त्वम्।
वामांगमायामि तदा त्वदीयं
जगाद कन्या वचनं षष्ठम् ॥6॥
तू माझ्याबरोबर सहा पावले चाललीस, तू सर्व ऋतुमध्ये सुख देणारी हो.
सातवे पाऊल :
न सेवनीया परिकी यजाया
त्वया भवेभाविनि कामनीश्च।
वामांगमायामि तदा त्वदीयं
जगाद कन्या वचनं सप्तम् ॥7॥
तू माझ्याबरोबर सात पावले चाललीस, तुझे माझ्याशी सख्य दृढ होवो. आपल्या कुटुंबाचे सुख-दु:ख आपण आपल्या हृदयात जतन करू.
अशी ही सात वचने आहेत. दोघांनीही ती एकमेकांना द्यायची असतात. ती विधिपूर्वक दिली- घेतली जातात. आयुष्यभर त्याप्रमाणे जीवन एकमेकांच्या सहवासात व्यतीत करावं असं धर्म सांगतो.
केवळ एकत्र राहिल्यानं (लिव्ह इन रिलेशनशिप) हे संस्कार होत नाहीत, हे खरं; पण धार्मिक संस्कार न होतासुद्धा मनाच्या दृढ विश्वासानं दोघेही जन्मभर एकमेकांना साथ देऊ शकतात. मग ह्या नात्यात धार्मिक संस्कार असो वा नसोत किंवा कायदेशीर करार असो वा नसो. नात्याशी प्रामाणिक राहून ते निभावणं याला महत्त्व आहे.
माझ्या परिचयाच्या एक बाई आहेत, वयानं असतील चाळीस- बेचाळीसच्या. रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचं मोठं घर, शेतीवाडी आहे. गाड्या आहेत. सगळी सधन मंडळी आहेत. एकत्र कुटुंब आहे, पण बाईंना काही त्रास नव्हता. मात्र बाई अनेक वर्षांपासून पतीला सोडून माहेरी राहिलेल्या आहेत. माहेरी आई एकटीच आहे, वडील हयात नाहीत. माहेरी राहून त्यांनी पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी त्या नवर्याचं घर सोडून आल्या. आपल्याला काहीतरी करायचंय, ते नवर्याघरी राहून करताच येत नाही, म्हणून त्या आईजवळ रहायला लागल्या. नंतर कधीतरी त्यांचा माझ्याशी परिचय झाला. नंतर बोलता बोलता असंही कळलं की, बाईंना लैंगिक इच्छा अनिवार आहे, पण तिच्या पतीला मात्र ती अजिबात नाही. नंतर स्वतःच्या पायावर उभं रहायचंच म्हणून बाई बेंगलोरला गेल्या. तिथं एका मराठी माणसाच्या मोठ्या कार्यालयात नोकरी मिळाली. त्या मालकाशी यांचं सूत जुळलं आणि लैंगिक संबंधाची लयलूट सुरू झाली. त्या बाई एके दिवशी पुन्हा मला भेटल्या, मी चौकशी करून रत्नागिरीला कधी गेल्या होत्या की नाही, असा सहज प्रश्न केला. तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर मासलेवाईक आहे. त्या म्हणाल्या, ‘सरांशी वचनात बांधलेय. त्यांनी परवानगी दिल्याशिवाय मला कुठं जाता येत नाही...’ मी अवाक झालो. याच बाईंनी कधी काळी आपल्या पतीलाही सात वचनं दिली होती. त्या वचनांचं काय? ही गोष्ट बाई सोयीस्करपणे विसरल्या होत्या. या बाबतीत आपण काय म्हणू? नवरा त्यांचं पालनपोषण करत नव्हता का? तर- करत होता. छळत होता का? मारत होता का? तर- नाही. फक्त तिथं शिक्षणाच्या सोयी कमी आहेत. पण त्यासाठी नवर्याला सोडून राहण्याची आवश्यकता नव्हती. राहता राहिला लैंगिक सुखाचा प्रश्न. त्याचं काय करायचं? यावर माझ्याकडे तरी उत्तर नाही. तो फक्त त्यांचाच प्रश्न आहे. त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य आहे, त्याचा लाभ त्या घेत आहेत.
समाजात असेही नमुने पहायला मिळतात.
याउलट नवरा, सासू, नणंद यांच्याकडून अनन्वित अत्याचार सहन करत असतानाही नवर्याचं घर न सोडणार्या अनेक स्त्रिया समाजात आपल्याला दिसतात. त्यांनी छळू सोसू नयेच, त्यांनी त्याविरुद्ध बंड करून उठायला हवं, कायद्याचं सहाय्य घ्यायला हवं, आई-वडील आणि इतर जवळच्या नातेवाईकांनाही बोलवायला हवं. अगदीच असह्य झालं, तर घटस्फोट घ्यायला हवा. संसार हा दोघांनी करायचा असतो. दोघांच्या सहमतीने, सहवासाने तो फुलायला बहरायला हवा.
दारू पिऊन पत्नीला झोडपणं हा जंगल प्रकार करणारा पती असेल, तर त्याला वठणीवर आणायला हवं, प्रसंगी त्याला सोडायला लागलं तर सोडायला हवं. पण ते जगणं तसं असह्य असेल तर! पण असह्य होत नसेल आणि तडजोड करून विवाह टिकवणं शक्य असेल, तर तो टिकवायला हवा. एक काळ असाही होता, की, ‘पावसानं झोडलं आणि नवर्यानं मारलं, तर सांगायचं कुणाला?’
‘मार नवर्याचा नाही खायचा तर काय शिपुर्ड्याचा खायचा?’ असं बोलण्यात बायका धन्यता मानत होत्या. नवर्यानं बायकोला मारणं हा जणू त्याचा जन्मसिद्ध हक्कच आहे, असं स्त्रिया स्वतःच मानत होत्या. म्हणजे ते समाजमान्य होतं. वाईट असलं तरी ते समाजात रूढ होतं. याचं कारण शोधायला गेलं तर काय आढळतं? व्यसनी किंवा हुकूमशाही प्रवृत्तीच्या नवर्याला बायकोला मारण्यात पुरुषार्थ वाटत होता. बाहेर कुठं पुरुषार्थ न गाजवायला मिळालेले पुरुष बाहेरच्या सगळ्या जगाचा, आपल्या अपयशाचा, अपमानाचा, अवहेलनेचा राग आपल्या हक्काच्या बायकोवर काढायचे, अजूनही काढतात. बायकाही तो मार सहन करतात, शिव्या निमूटपणाने खातात. कारण त्यांना संसार टिकवायचा असतो. नवरा कसाही असला, तरी तो कुंकवाचा धनी असतो, आधार असतो, दोन वेळेला चार घास खायला घालत असतो, कपडेलत्ते करत असतो, घरात राहू देत असतो. अन्न- वस्त्र- निवारा देणारा तो घरचा धनी असतो. पूर्वी ही समजूत अगदीच दृढ होती. आणि आजच्या काळात 25- 30 वर्षे संसार केलेल्या जोडप्यांत आता ती शिथिल झालेली आहे, ते भय, ते दडपण आता कमी झालेलं आहे, असं म्हणायला हरकत नाही. पण संसार टिकवणं, मग तो नाइलाज म्हणून का असेना ही तेव्हाची अपरिहार्यता होती. सासू- सासर्याचा, नवर्याचा- दिराचा- नणंदेचा जाच सहन करून संसार टिकवणं हे स्त्रियांना अत्यंत आवश्यक वाटायचं. कित्येक संसार नाइलाज म्हणून टिकायचे. अगदी कमी संसार प्रेम- विश्वासाच्या पायावर टिकायचे. त्यातही छळणारा नवरा आयुष्याच्या उत्तरार्धात मवाळ झाल्याचीही बरीच उदाहरणं समाजात दिसतात.
आज मात्र ही परिस्थिती बदललेली आहे. आधी नातेसंबंधांत राहून आपलं जमतं का बघायचं, जमतंय असं वाटलं, तर पुढेही एकत्र राहायचं आणि दोघांनाही जर वाटलं आणि पटलं, तर लग्नही करायचं, मुलं जन्माला घालायची.
मला आणखी एक वेगळं उदाहरण माहीत आहे. एक स्त्री आणि पुरुष नातेसंबंधात राहिले. त्यांना एक मुलगी झाली. त्या मुलीला त्यांनी शाळेत दाखल केलं नाही. तिचा सगळा अभ्यास घरीच घेतला. ती मुलगी दहावीच्या परीक्षेत खूप चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. नातेसंबंधात राहून सुखाचा व यशस्वी संसार केल्याचं हे एक चांगलं उदाहरण आहे. अशी आणखीही जोडपी समाजात सुखानं नांदत आहेत. आज हे घडत आहे. सहजीवन म्हणजे चांगली सोबत आणि त्या सोबतीसमवेत केलेली यशस्वी वाटचाल, मग लग्नाचे धार्मिक संस्कार असोत वा नसोत; कोणताही करार असो वा नसो. सोबतीनं जगणं आणि एकमेकांना समजून घेऊन, सुखदुःखात समरस होऊन जगणं हे आवश्यक आहे. ‘तुझे तेच माझे असू लागले’ ही भावना दोघांच्याही अंतःकरणात फुलणं हे महत्त्वाचं आहे.
चारोळीचे पीक वारेमाप येऊन ते ओसरण्याच्या आधी एक चारोळी मी वाचली होती.
घर दोघांचं असतं
दोघांनी सावरायचं
एकानं पसरलं, तर
दुसर्यानं आवरायचं.
हे पसरणं आणि आवरणं यावर संसार चाललेला असतो. कुणीतरी पसरतं आणि कुणीतरी आवरतं. दोघांनीही तो पसरला, तर ‘संसाराचं पोतेरं’ झालंच म्हणून समजा!
नाइलाज म्हणून टिकवलेला संसार आणि स्वेच्छेने स्वीकारलेले, टिकवलेले नातेसंबंध यांतील काळाची सीमारेषा कोणती, हे जर शोधायचा प्रयत्न केला, तर
विसावे शतक आणि एकविसावे शतक यांचा उल्लेख करावा लागेल. विसावे शतक संपून एकविसावे शतक सुरू झाले, त्या उंबरठ्यावर नातेसंबंधात राहणं ही
संकल्पना भारतात रुजायला लागली. नंतर ती उगवली, तिचं रोपटं झालं, मग तिचा वृक्ष झाला. आता तर नातेसंबंधात राहणं यात कुणाला फारसं काही वावगं वाटेनासं झालंय.
1981-82 मध्ये कधीतरी मी महाविद्यालयात शिकत असताना एका एकांकिकेचा प्रयोग झाला होता. पद्माकर डावरे यांची ‘दादा, भाई, नवरोजी’ ही एकांकिका होती. त्यात ‘दादा’ ही भूमिका रवी ताम्हणकरनं केली होती, तर मी ‘भाई’ साकारला होता. नवरोजीचा प्रवेश अगदी शेवटी होतो. ते काम कुणी केलं होतं, हे आता आठवत नाही. एकांकिकेत एक वाक्य आहे. नायिका म्हणते, ‘पण मला नवरा नकोच आहे, मला हवा आहे कंपॅनियन...’ हे वाक्य तेव्हा मला नवीनच वाटत होते. नवरा नव्हे, तर कंपॅनियन- सोबती.
नवरा ही संकल्पना आपल्या समाजात इतकी घट्ट रुजलेली आहे, की, सोबती किंवा जोडीदार हे चटकन मनाला शिवत नाही. खरंतर आयुष्याचा जोडीदार ही संकल्पना आपल्या धार्मिक संस्कारात आहे, पण समाजात मात्र तो नवराच असतो. बायको ही नवर्याच्या हक्काची, मालकीची. अगदी अलीकडच्या काळापर्यंत किंवा आताही काही कुटुंबात ‘आमचे मालक’ असंच पत्नी पतीला उद्देशून बोलत असते. सोबती म्हटलं तर मालक होत नाही. त्यामुळं 22-23 व्या वर्षी माझ्या मनात ते वाक्य अगदी घट्ट शिरून बसलं.
आपणही आपल्या पत्नीचा सोबती व्हायचं, हे मी तेव्हा ठरवलं. पत्नीला पतीकडून पहिल्यांदा हवा असतो तो विश्वास. नंतर प्रेम, आर्थिक संरक्षण, समाजातील स्थान. अन्न, वस्त्र आणि हक्काचा निवारा हे सारे त्या विश्वासातच अंतर्भूत असते. त्या जगण्याच्या गरजा आहेत. पण विश्वास आणि प्रेम हा त्यांच्या सहजीवनाचा पाया असतो. मग कधी काळी स्त्रीला वैधव्य आलं, तरी आपल्या पतीची विधवा म्हणून स्वाभिमानाने त्या जगतात, अशीही उदाहरणं समाजात आहेत. त्यामुळं विवाह आणि धार्मिक संस्कार हे जसे महत्त्वाचे आहेत, तसेच संस्कार आणि करार या व्यतिरिक्त केवळ नातेसंबंधात राहणं हेहि महत्त्वाचं आहे. ‘तुझे तेच माझे असू लागले...’ ही ओळ म्हणूनच सहजीवनासाठी अत्यावश्यक आहे.
-श्रीराम ग. पचिंद्रे,
सूर्यपंख, प्लॉट नं. 10-11, एन. टी. सरनाईक नगर,
राजगड कॉलनी (प.),
कोल्हापूर- 416 007.
7350009433
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा