------------------------------------------------------------------------------------------------
धगधगते क्रांतिपर्वः सरदार अजितसिंग
-----------------------------
श्रीराम ग. पचिंद्रे,
ज्येष्ठ संपादक, साहित्यिक, कवी.
7350009433
सरदार भगतसिंग यांना क्रांतिकार्याची प्रेरणा देणारे, इटलीमध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना करून सैन्य गोळा करून नंतर ती सेना सुभाषचंद्र बोस यांच्या हाती सोपवणारे आयुष्यभर परागंदा राहून ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारणारे थोर क्रांतिकारक सरदार अजितसिंग यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्याच दिवशी प्राण सोडले.
-----------------------------------------------------------
आपले सारे जीवन आगीशी खेळण्यात आणि जन्मभर ब्रिटिश सत्तेशी संघर्ष करण्यात व्यतीत केलेल्या महान क्रांतिकारक सरदार अजितसिंग यांनी 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालेले पाहूनच आपला देह ठेवला. आज त्यांचा 75 वा पुण्यस्मरण दिन आहे. सरदार अजितसिंग हे हुतात्मा भगतसिंग यांचे काका होत. भगतसिंग यांना क्रांतीची प्रेरणा देणार्या अजितसिंग यांचा जन्म देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच झाला आहे अशी त्यांची धारणा होती. अजितसिंग यांना स्वर्णसिंग आणि किशनसिंग हे होन भाऊ. सरदार किशनसिंग यांचे सुपत्र भगतसिंग. अपवाद वगळता हे सारे कुटुंबच देशसेवेत गुंतलेले. पहिल्या अँग्लो शीख युद्धात अजितसिंग यांचे पूर्वज लढले होते. ते स्वतः एक चैतन्याचा स्रोत होते. ज्यांनी देशाला महान क्रांतिकारक भगतसिंग दिले, त्यांची थोरवीही तितकीच महान आहे.
अगदी बालपणीच सरदार अजितसिंग यांच्या मनात अत्याचारी ब्रिटिश राजवटीविषयी प्रचंड राग ज्वालामुखीसारखा धगधगत होता. त्यांचे काका ब्रिटिशांच्या चाकरीत राहून लांगूलचालन करत होते. कुठलाही क्रांतीकारक एकदमच क्रांतिकार्याला वाहून घेत असतो. त्यासाठी आधी काहीतरी पार्श्वभूमी असावी लागते. लाहोरला महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्राचार्य हंसराज आणि थोर देशभक्त लाला लजपतराय यांच्याशी त्यांची भेट झाली. लाला लजपतराय यांच्या दृढ निश्चयी क्रांतिकारक विचाराच्या देशभक्ताच्या विचारांनी अजितसिंग प्रभावित झाले. तसेच समाजसेवेसाठी वाहून घेतलेल्या आर्य समाजाच्या विचारांकडे ते ओढले गेले. इटलीचे क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी आणि गॅरिबाल्डी यांच्याविषयी त्यांनी वाचले होते. अशा सर्वांचा एकत्रित प्रभाव अजितसिंग यांच्यावर पडला. लहान वयातच ते स्वदेशी चळवळीत सामील झाले.
1903 मध्ये सरदार अजितसिंग आणि किशनसिंग हे बंधू दिल्लीच्या बरेली महाविद्यालयात जात होते. तिथे शिक्षण घेणार्या भारतीय राजपुत्रांना एकत्रित करून त्यांच्याकडून क्रांतिकार्यासाठी आर्थिक सहकार्य मिळवण्याचा ते प्रयत्न करायला लागले. क्रांतिकारकांना शस्त्रे आणि दारूगोळा पुरवावा आणि प्रत्यक्ष चळवळीतही राजपुत्रांनी सहभागी व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न चालवला होता. सरदार अजितसिंग हे डिसेंबर 1906 मध्ये कोलकत्यात येऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये एक जहालमतवादी म्हणून सहभागी झाले. त्यांना मवाळांची धीम्या गतीची चाल मान्य नव्हती. स्वराज्य मिळवण्यासाठी जोरदार पावले उचलावी लागतील असे मत ते सातत्याने मांडत राहिले. दादाभाई नौरोजी इत्यादी नेत्यांची संयमाची भाषा अजितसिंग यांना मान्य नव्हती. स्वराज्याच्या मागणीसाठी कोलकत्यात भरवलेल्या सभेत त्यांची मोतिलाल घोष, बाबू अरविंद घोष, रोमेशचंद्र दत्त, बाळ गंगाधर टिळक अशा जहाल विचारांच्या नेत्यांशी भेट झाली.
पंजाबला परतल्यावर सरदारांनी 1907 मध्ये ‘भारत माता सभा’ नावाची क्रांतिकारी संघटना स्थापन केली. तिचे कार्यालय लाहोर येथे होते. सूफी अंबाप्रसाद, झिया उल हक, लालचंद फलक, सरदार किशनसिंग आणि स्वर्णसिंग यांच्यासारखे क्रांतिकारक विचारांचे सदस्य सभेत आले. कोणतीही नोंद नसलेली, कसल्याही प्रसिद्धीपासून दूर असलेल्या सभेचे काम अतिशय गोपनीय होते. ब्रिटिश राजवटीचे कंबरडे मोडायचे हे एकमेव ध्येय बाळगून ही सभा क्रांतिकारक संघटन करत होती. खेडोपाड्यापर्यंत ब्रिटिशविरोधी भावना रुजवण्याचे काम सभा करायला लागली. पुढे अतिशय गाजलेली ‘पगडी संभाल ओ जट्टा’ ही चैतन्याने रसरसलेली कविता ‘जंग सयाल’ चे संपादक बांके दयाल यांनी लिहिली. पुढील काळात सरदार भगतसिंग यांनी ती शीख समुदायासमोर गायली. जिथे जिथे शक्य आहे, तिथे तिथे- अगदी लग्नसमारंभातही सरदार अजितसिंग यांनी क्रांतिकारकांचे विचार पोहोचवले. ‘सरकारकडे स्वराज्याची भीक’ मागणार्या काँग्रेस नेत्यांचे मवाळ धोरण त्यांना मान्य नव्हते. “तुम्ही सरकारला अर्ज, विनंत्या, पत्रे देता, त्याचे पुढे काय झाले?’ असा रोखठोक प्रश्न ते विचारत. सर्वत्र ब्रिटिशविरोधी वातावरण निर्माण करण्यात त्यांना यश मिळायला लागले. ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार, सरकारच्या धोरणांना कडवा विरोध असे चळवळीचे वारे पंजाब, बंगाल असे करत करत देशभर पसरायला लागले. ‘राजद्रोहाचे विष लोकांच्या मनात भिनत चालले आहे. छापील मजकूर आणि भाषणे यातून हे अधिकच वाढत चालले आहे. 1818 मधील तिसर्या कायद्यातील सेक्शन 2 खाली सरदार अजितसिंग या क्रांतिकारक आणि खतरनाक मनुष्य अजितसिंग आणि क्रांतिकारक लाला लजपतराय यांना हद्दपार करावे” असा आदेश निघाला. दोघांनाही मंडालेच्या कारावासात पाठवण्यात आले. नंतर त्यांची 1907 च्या नोव्हेंबर महिन्यात सुटका करण्यात आली. त्यांनी लगेच काँग्रेस अधिवेशनाला हजेरी लावली. देशातील क्रांतिकार्य कसे वाढवता येईल याविषयी बाबू अरविंद घोष यांच्याशी त्यांची सातत्याने चर्चा झाली.
पुढील वर्षी ते पंजाबला परतले. त्यांनी अनाथ मुलांच्या पालनाची सोय करण्यात पुढाकार घेतला. एक मोठ्या समाजकार्याबरोबरच ही मुले पुढे क्रांतिकारक चळवळी उभारतील अशी त्यांची भावना होती. समाजातील भेदाभेद नष्ट व्हावा, याठीही त्यांनी खूप प्रयत्न केले. सर्व जातिधर्माच्या लोकांना देशकार्याकडे वळवण्याचा त्यांचा उद्देश सफलही झाला. अजितसिंग यांच्या चळवळीकडे ब्रिटिश गुप्तचर खात्याचे बारकाईने लक्ष होते. त्यांच्या आणि त्यांच्या जवळच्या नातलगांच्या घरातील क्रांतिकारक साहित्य जप्त करण्यात आले. त्यांच्या सगळ्या सहकार्यांना पडकून त्यांचा छळ करण्यात आला. क्रांतिकारक लेखनाची पत्रके जिथे छापली जायची, ते छापखाने, पत्रके विकली जात ती दुकाने यांना टाळे लावण्यात आले. नंतर अजितसिंग यांच्यासह काही सहकारी लपतछपत पर्शियला पोहोचले. त्यानंतर ते जगभर फिरत राहिले. दक्षिण अमेरिका, जर्मनी, इटली, पोलंड, रशिया, इजिप्त, मोरोक्को अशा ठिकाणच्या क्रांतिकारकांना ते भेटले. मुसोलिनीलाही ते भेटले. पहिले महायुद्ध सुरू झाल्यावर ते ब्राझिलला गेले. तिथे त्यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी संस्था स्थापन केली. ब्राझिलमध्ये राहून गदर पार्टीच्या नेत्यांशी संपर्क साधणे त्यांना सोपे जात असे. 1932 ते 38 मध्ये त्यांनी फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि जर्मनीत कार्य केले. युरोपमध्ये कार्य करणार्या भारतीय क्रांतिकारकांची त्यांनी चर्चा केली. देशगौरव सुभाषचंद्र बोस यांनाही ते भेटले.
सरदार अजितसिंग यांनी इटलीत असताना ‘आझाद हिंद सेने’ची स्थापना केली. भारतीय युद्धकैद्यांच्या माध्यमातून त्यांनी एक सैन्य त्यांनी उभे केले. याच सेनेचे पुढे सुभाषचंद्र बोस हे ‘नेताजी’ झाले व अजितसिंग यांचे यांचे क्रांतिकार्य सुभाषबाबूंनी पुढे नेले. ब्रिटिश सरकारविरुद्ध युद्ध पुकारले.
1945 च्या मे महिन्यात अजितसिंग यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना जर्मनीतील कैद्यांच्या तळामध्ये ठेवण्यात आले. तिथले वातावरण, अन्न, पाणी याचा त्यांच्यावर दुष्परिणाम झाला. लष्कराच्या विविध छावण्यांमध्ये त्यांना हलवण्यात आले. तिथे त्यांचे खूप हाल झाले, खूप दगदग सोसावी लागली. जर्मनीमध्ये ते आजारी पडले, तेव्हा त्यांची तपासणी केली. डॉक्टरांनी त्यांना क्षयरोग झाल्याची शक्यता व्यक्त केली. नंतर त्यांना किळसवाण्या रुग्ण ठेवलेल्या खोलीत ठेवण्यात आले. तिथल्या गैरव्यवस्थेविरुद्ध अजितसिंग यांनी गार्हाणे मांडले. तिथून त्यांना लंडनला पाठवण्यात आले. तिथे इंडिया हाऊसच्या प्रतिनिधींनी त्यांची विचारपूस केली. तिथल्या गुरुद्वारात भारतीय क्रांतिकारकांची बैठक घेऊन त्यांचा सन्मान करायचा होता. त्या बैठकीत अजितसिंग यांनी सहभागी होऊ नये असा पं. जवाहरलाल नेहरू यांचा निरोप असल्याचे त्या प्रतिनिधींनी अजितसिंग यांना सांगितले. युरोपात असताना अजितसिंग यांचा पं. नेहरूंशी पत्रसंपकर असायचा. त्यामुळे त्यांच्या हालचालींविषयी नेहरूंना माहिती कळत असे. पण अजितसिंग त्या बैठकीला गेले. आपल्याजवळील रक्कम त्यांनी क्रांतिकारक सहकार्यांना वाटून टाकली. त्याचवेळी त्यांचे बंधू किशनसिंग हे लंडनमध्येच होते व अजितसिंग यांच्या संपर्कात होते. मध्यंतरीच्या काळात त्यांचा लाडका पुतण्या भगतसिंग फासावर चढून हुतात्मा झाला होता. अनेक क्रांतिकारकांनीही देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करले होते, त्यांचे जिवलग नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अखेर काय झाले असा प्रश्न देशवासीयांना छळत होता. आणि अशा परिस्थितीत अजितसिंग देशात परतले.
हे महान क्रांतिकारक 1909 मध्ये भारत सोडून परागंदा झाले होते. ते 8 मार्च 1947 दिवशी भारतात कराची विमानतळावर पोहोचले. तिथे त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. पंडित नेहरूंनी त्यांना दूरध्वनी केला. नंतर ते विमानाने दिल्लीला गेले. आयुष्यभर स्वातंत्र्याच्या ध्यासाने पछाडलेले, देशवासीयांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी वणवण भटकणारे सरदार अजितसिंग यांनी 15 ऑगस्ट 1947 या दिवशी लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकल्याची वार्ता ऐकून प्राण सोडला.
(आधार- जिवंत हुतात्मा सरदार अजितसिंग, आत्मचरित्र, भाषणे आणि लेखन. अनुवाद- सौ. सुजाता पेंडसे)
----------------------------------------------------------------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा